18 फेब्रुवारीपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर होणार थेट कडक कारवाई; एवढा दंड भरावा लागेल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HSRP Number Plate: राज्यात वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) बाबत आता परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. अंतिम मुदत संपून महिना उलटून गेला असतानाही मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी HSRP बसवून घेतलेले नसल्याने, १८ फेब्रुवारी २०२६ पासून थेट दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

HSRP संदर्भातील नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे चित्र समोर आल्यानंतर विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये आला आहे. चोरीचे वाहन ओळखणे, बनावट नंबर प्लेटवर आळा घालणे आणि वाहतूक व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, हा या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, नागरिकांना दिलासा देत प्रशासनाने १५ दिवसांचा ‘ग्रेस पिरीयड’ जाहीर केला आहे. ज्या वाहनधारकांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी HSRP साठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, मात्र अद्याप प्रत्यक्ष नंबर प्लेट बसवलेली नाही, अशा नागरिकांना १८ फेब्रुवारीपर्यंतची अंतिम संधी देण्यात आली आहे. वेळेत नोंदणी केलेल्या वाहनधारकांवर अन्याय होऊ नये, यासाठीच हा अतिरिक्त कालावधी दिल्याचे भिमनवार यांनी स्पष्ट केले.

मात्र, ३१ डिसेंबरनंतर नोंदणी केलेल्या किंवा अजूनही नोंदणी न करणाऱ्या वाहनधारकांना थेट १,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. यामध्ये दुचाकी, चारचाकी तसेच व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. HSRP Number Plate

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील स्थिती विशेष चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. या भागात सुमारे २४ लाखांहून अधिक पात्र वाहने असताना, केवळ ८.५७ लाख वाहनधारकांनीच HSRP साठी नोंदणी केली आहे. म्हणजेच जवळपास ६५ टक्के वाहने अजूनही जुन्याच नंबर प्लेटवर रस्त्यावर धावत आहेत. राज्यभरात ही संख्या आणखी गंभीर असून, एक कोटीहून अधिक वाहने अद्याप HSRP शिवाय असल्याची माहिती पुढे आली आहे.

१८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तपासणी मोहिमेत केवळ नंबर प्लेटपुरतीच मर्यादा नसेल. वाहतूक पोलिस आणि परिवहन विभागाकडून नोंदणी प्रमाणपत्र (RC), वाहन विमा, PUC प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांचीही सखोल तपासणी केली जाणार आहे. यापैकी एखादेही कागदपत्र नसल्यास दंडाची रक्कम वाढू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, HSRP बसवणाऱ्या अधिकृत फिटमेंट सेंटर्ससमोरही अडचणी वाढताना दिसत आहेत. अनेक वाहनधारक अपॉइंटमेंट बुक करूनही वेळेवर येत नसल्याने तयार नंबर प्लेट्स सेंटर्समध्ये साठून राहिल्या आहेत. यामुळे प्रक्रिया मंदावली असून, प्रशासनाने वाहनधारकांना तात्काळ HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले आहे.

“आता कोणतीही सवलत दिली जाणार नाही. नियम सर्वांसाठी समान आहेत,” असा ठाम संदेश परिवहन विभागाने दिला आहे. त्यामुळे दंड, त्रास आणि वेळेचा अपव्यय टाळायचा असेल, तर वाहनधारकांनी तत्काळ HSRP बसवून घेणेच हिताचे ठरणार आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

1 thought on “18 फेब्रुवारीपासून HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर होणार थेट कडक कारवाई; एवढा दंड भरावा लागेल”

  1. माझी hsrp नवीन नंबर प्लेट चुकीच्या नंबर ने आली आहे मग आम्ही दंड का भरायचा? Nov end मध्ये contaractor कडे नंबर प्लेट चुकीची आली आहे पण त्याची दुरुस्ती होऊन परत आली नाही. आता पोलिस अडवल्यानंतर आम्ही काय उत्तर द्यायचे आणि त्यांना ते मान्य होईल का? सामान्य माणसाने चूक नसताना फक्त या साध्या प्रॉब्लेम्स मधे का अडकून पडायचे?

    Reply

Leave a Comment