लाल मिरचीच्या दरात तुफान वाढ! मिरचीला मिळतोय सोन्याचा दर; जाणून घ्या कोणत्या मिरचीला किती दर?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Red Chilli Price : सर्वसामान्यांसाठी यावर्षी स्वयंपाकघरातील तिखटपणाच महागात पडणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात सरासरी ३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असून ही वाढ केवळ आकड्यांपुरती मर्यादित न राहता थेट सर्वसामान्यांच्या खिशाला चटका देणारी ठरत आहे. गेल्या हंगामात मुबलक उत्पादनामुळे मिरचीचे दर आटोक्यात होते, मात्र यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे संपूर्ण चित्र बदलले आहे.

यावर्षी खरीप हंगामात मिरचीचे पीक फुलोऱ्यात असतानाच सततच्या पावसाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली, परिणामी उत्पादनात लक्षणीय घट झाली. विशेषतः ‘ब्याडगी’सारख्या दर्जेदार मिरचीचे नुकसान अधिक झाल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. गेल्या वर्षी अखंड हंगामात एक नंबर ‘ब्याडगी’ मिरचीचा दर ३५० रुपयांच्या पुढे गेला नव्हता. मात्र यंदा त्याच मिरचीचे सरासरी दर तब्बल ३० टक्क्यांनी वाढले असून बाजारात तिखटपणाबरोबरच दरांची झळही जाणवू लागली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात साधारणतः जानेवारी ते मे हा लाल मिरचीचा प्रमुख हंगाम मानला जातो. या काळात घरगुती वापरासह हॉटेल, उद्योग आणि व्यापारी स्तरावर मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी होते. स्थानिक उत्पादनाबरोबरच आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा येथून मोठ्या प्रमाणावर मिरचीची आवक होते, तर गुजरातमधून येणारी आवक तुलनेने अत्यल्प असते. मात्र यंदा सर्वच राज्यांमध्ये पावसाचा फटका बसल्याने बाहेरून येणाऱ्या मिरचीचे प्रमाणही कमी झाले आहे.

सध्याच्या बाजारभावांकडे पाहिले तर ‘केडीएल’ ब्याडगी मिरचीचे दर प्रतिकिलो ३०० ते ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. संकेश्वरी जवारी (ओरिजनल) मिरचीने तर थेट ११०० ते १२०० रुपयांची मजल मारली आहे. तेजा मिरची २५० ते ३५०, गुंटूर ३०० ते ३५०, सिजेंटा ४०० ते ५००, तर गरुडा मिरची २५० ते ४०० रुपयांदरम्यान विकली जात आहे. दर्जा, रंग आणि तिखटपणानुसार दरात मोठी तफावत दिसून येत आहे.

दरवाढीचा थेट परिणाम ग्राहकांच्या खरेदीवर होताना दिसतो आहे. मिरची व्यापारी राजेंद्र जंगम (सांगरूळ) यांच्या मते, उत्पादन घटल्याने दर वाढले असून ग्राहकांनी आतापासूनच मिरची खरेदी करताना हात आखडता घ्यायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी जुना साठवलेला मालही बाजारात विक्रीसाठी येत असून, त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते सांगतात.

एकूणच, सततचा पाऊस, घटलेले उत्पादन आणि कमी आवक यामुळे यंदा लाल मिरचीचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील ही महत्त्वाची वस्तू महागल्याने सर्वसामान्य गृहिणींपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत सगळ्यांनाच तडाखा बसणार आहे. त्यामुळे येत्या काळात मिरचीच्या बाजारावर आणि दरांच्या हालचालींवर सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे. Red Chilli Price

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment