कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कापसाच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या नवीन

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cotton Rate Today: खेड्यापाड्यात अजूनही पांढऱ्या सोन्याची आवक सुरू असताना, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत कापसाच्या दरात तब्बल ६०० रुपयांची घसरण नोंदवली गेली असून, एकेकाळी प्रति क्विंटल ८ हजार ६०० रुपयांपर्यंत पोहोचलेले दर आता थेट ८ हजार रुपयांवर आले आहेत. बाजारात तसेच गावपातळीवरील खेडा खरेदीत सध्या एवढाच भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. मेहनतीने पिकवलेला कापूस विकायचा की थांबायचा, या संभ्रमात अनेक शेतकरी सापडले आहेत.

शासनाने जाहीर केलेल्या हमीदरानुसार भारतीय कापूस महामंडळामार्फत (सीसीआय) जिल्ह्यात विविध केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात हमीदराच्या तुलनेत खासगी व्यापारी आणि गावात होणाऱ्या खेडा खरेदीत जास्त दर मिळत असल्याने गेल्या महिनाभरापासून शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. कागदपत्रांची झंझट, मोजमापातील अडचणी आणि विलंब यामुळे शेतकरी थेट बाजारात किंवा गावातच कापूस विकणे पसंत करत आहेत. काही दिवसांपूर्वी मिळालेला चांगला भाव पाहून अनेकांनी कापूस साठवून ठेवला होता, मात्र आता अचानक दर घसरल्याने त्या निर्णयाचा फटका बसताना दिसतो आहे.

यंदाचा कापूस हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच दरात घसरण सुरू झाल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. घरखर्च, कर्जाची परतफेड, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि पुढील हंगामाची तयारी यासाठी पैशांची गरज असलेल्या शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात कापूस विकावा लागत आहे. “भाव वाढेल या अपेक्षेने थांबलो होतो, पण आता गरज भागवण्यासाठी कमी दरात विक्री करावी लागतेय,” अशी खंत अनेक कापूस उत्पादक व्यक्त करत आहेत. Cotton Rate Today

दरम्यान, व्यापाऱ्यांकडून बाजारातील मागणी, आवक आणि जागतिक घडामोडींचा हवाला दिला जात असला, तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अडचणीचा ठरत आहे. हंगाम संपत चालला असताना भाव आणखी घसरतात की स्थिर राहतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पांढऱ्या सोन्यावर अवलंबून असलेल्या अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी पुढील काही दिवस निर्णायक ठरणार असून, कापसाच्या भावात पुन्हा तेजी येईल, अशीच आशा सध्या शेतकऱ्यांच्या मनात आहे.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment