Gold Rate News: गेल्या काही वर्षांत सोन्याने अक्षरशः विक्रमी झेप घेतली. लग्नसराई असो, सणासुदीचा काळ असो किंवा गुंतवणुकीसाठी खरेदी प्रत्येक वेळी ग्राहकांना वाढलेल्या दरांचा सामना करावा लागला. काही महिन्यांपूर्वी तर सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल १.८४ लाख रुपयांपर्यंत गेला होता. अनेकांनी “आता सोनं हाताबाहेर गेलं” असं म्हणत खरेदी पुढे ढकलली.
मात्र फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून चित्र बदलायला लागलं. अवघ्या दोन आठवड्यांत जवळपास ३६ हजार रुपयांची घसरण झाली आणि सध्या १ तोळा सोन्याचा दर सुमारे १,५६,२०० रुपयांवर आला आहे. महिनाभराच्या तुलनेत तब्बल २४,५०० रुपयांची घट झाली असून सोनं सुमारे १३.५० टक्क्यांनी स्वस्त झालं आहे. तरीही सर्वसामान्यांसाठी हा दर अजूनही मोठाच आहे. पण आता बाजारात आणखी मोठी चर्चा सुरू झाली आहे – सोनं १ लाखांच्या खाली येऊ शकतं का?
तज्ज्ञांचा मोठा अंदाज
व्यापार आणि जागतिक बाजारपेठेवर संशोधन करणाऱ्या PACE 360 या संस्थेचे जागतिक रणनितिकार Amit Goel यांनी सोन्याच्या दराबाबत धाडसी अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे सोन्याच्या मागणीत बदल होऊ शकतो आणि २०२७ च्या अखेरीस भारतात प्रति तोळा सोन्याचा दर १ लाख रुपयांपेक्षाही खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा अंदाज समोर आल्यानंतर गुंतवणूकदार आणि सोनं खरेदी करू इच्छिणाऱ्या कुटुंबांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.
जागतिक राजकारणाचा सोन्यावर परिणाम?
Bloomberg या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रशियातील Kremlin प्रशासन अमेरिकेसोबत पुन्हा आर्थिक भागीदारीकडे वळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर मॉस्कोने डॉलरआधारित व्यापार पुन्हा सुरू केला, तर त्याचा थेट परिणाम सोन्याच्या मागणीवर होऊ शकतो.
गेल्या काही वर्षांत BRICS देशांनी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याचा साठा वाढवण्यावर भर दिला होता. डॉलरऐवजी पर्यायी व्यवहार पद्धती तयार करण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यामुळे अनेक देशांनी सोन्याची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली आणि जागतिक दर वाढले. परंतु जर पुन्हा डॉलरद्वारे व्यवहार वाढले, तर सोन्यावरील दबाव कमी होऊ शकतो. मध्यवर्ती बँकांकडून विक्री वाढल्यास मागणी-पुरवठा तफावत कमी होऊन दर घसरू शकतात.
आंतरराष्ट्रीय दर कुठपर्यंत जाऊ शकतात?
अमित गोयल यांच्या मते, COMEX बाजारात सोन्याचा दर प्रति औंस ३००० डॉलरपर्यंत खाली येऊ शकतो. सध्या उच्चांकी पातळीवर गेलेले दर पुढील काही वर्षांत स्थिरावू शकतात. त्यानुसार भारतात प्रति तोळा दर ९० हजार ते १ लाख रुपयांच्या दरम्यान येण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
सध्या भारतात १० ग्रॅम सोन्यासाठी सुमारे १,८०,७७९ रुपये मोजावे लागत आहेत (उच्चांकी कालावधीत). त्यामुळे भविष्यात जर दर खरोखरच १ लाखांच्या खाली आले, तर ते ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो.
सोनं घ्यायचं की थांबायचं?
हा प्रश्न सध्या प्रत्येकाच्या मनात आहे. लग्न ठरलेली कुटुंबं, गुंतवणूकदार, तसेच सणासुदीच्या खरेदीची तयारी करणारे ग्राहक संभ्रमात आहेत. तज्ज्ञ मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगतात. सोनं हे दीर्घकालीन गुंतवणुकीचं साधन आहे. अल्पकालीन चढउतारांवर निर्णय घेण्यापेक्षा बाजाराची दिशा आणि स्वतःची आर्थिक गरज पाहणं महत्त्वाचं आहे.
सध्या दरात झालेली घसरण ही सुरुवात असू शकते, असं काही विश्लेषकांचं मत आहे. पण जागतिक राजकारण, डॉलरची ताकद, मध्यवर्ती बँकांचे निर्णय आणि गुंतवणूकदारांचा कल – या सगळ्यांवर पुढील दिशा अवलंबून असेल. Gold Rate News
सामान्य माणसासाठी काय अर्थ?
जर खरंच २०२७ पर्यंत सोनं १ लाखांच्या खाली आलं, तर मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी तो मोठा दिलासा ठरेल. मुलीच्या लग्नासाठी वर्षानुवर्षं साठवणूक करणाऱ्या आई-वडिलांना थोडं हलकं वाटेल. सणासुदीला सोन्याचा दागिना घेणं पुन्हा सहज शक्य होईल.
सध्या मात्र बाजारात अनिश्चितता आहे. त्यामुळे घाईघाईत निर्णय घेण्यापेक्षा दरावर लक्ष ठेवणं, विश्वासार्ह स्त्रोतांवर आधारित माहिती तपासणं आणि गरजेनुसार खरेदी करणं अधिक शहाणपणाचं ठरेल. सोन्याची चमक आज थोडी कमी झाली असली, तरी बाजारातील प्रत्येक हालचालीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. आता पुढील काही महिनेच ठरवतील – सोनं पुन्हा झेप घेणार की खरंच १ लाखांच्या खाली येणार?