Maharastra Highway News: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. बहुचर्चित नाशिक चेन्नई ग्रीनफील्ड हायवे (Nashik Chennai Greenfield Highway) प्रकल्पाला अखेर खऱ्या अर्थाने गती मिळताना दिसत आहे. National Highways Authority of India (राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण) यांनी पुढील दोन वर्षांत हा महत्त्वाकांक्षी महामार्ग पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला असून उर्वरित जमीन संपादनासाठी प्रशासकीय हालचालींना आता वेग आला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया पुन्हा रुळावर येण्याची चिन्हे दिसत आहेत.
जिल्ह्यात अजून १०७.३३ हेक्टर जमीन संपादित करायची बाकी आहे. त्यासाठी प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना नोंदवण्यासाठी २१ दिवसांची मुदत दिली आहे. विशेष म्हणजे १६०.३ ते १७२.६ किलोोमीटरदरम्यानच्या पट्ट्यातील जमीन तातडीने संपादित करण्यावर भर दिला जात आहे. प्राप्त हरकतींवर सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष ठिकाणी सुनावणी होणार असल्यामुळे प्रक्रिया पारदर्शक राहील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुळात केंद्र सरकारने सूरत ते चेन्नई असा सुमारे १२०० किलोमीटर लांबीचा हरितक्षेत्र महामार्ग उभारण्याची घोषणा केली होती. मात्र काही भागात शेतकऱ्यांच्या विरोधामुळे सूरत-नाशिक हा टप्पा वगळण्यात आला. आता नाशिकपासून पुढील टप्प्यावर भर देत हा महामार्ग दक्षिणेकडे नेण्याचे नियोजन आहे. नाशिकमधील आडगाव येथून सुरू होणारा हा मार्ग पुढे अहिल्यानगर, धाराशिव, सोलापूर आणि अक्कलकोटमार्गे जाणार आहे.
जिल्ह्यातील नाशिक, निफाड आणि सिन्नर या तीन तालुक्यांतील तब्बल ३० गावांतून हा महामार्ग जाणार आहे. एकूण ३८७.३३ हेक्टर जमीन संपादन अपेक्षित असून त्यापैकी २८० हेक्टर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित जमिनीचा प्रश्न मार्गी लागला, तर प्रकल्पाची कामे प्रत्यक्षात वेगाने सुरू होऊ शकतात. याआधीच्या विलंबामुळे प्रकल्पाची गती मंदावली होती, मात्र आता प्रशासन अधिक ठाम भूमिकेत दिसत आहे.
या महामार्गाची वैशिष्ट्येही तितकीच भव्य आहेत. नाशिक ते अक्कलकोट असा ३७४ किलोमीटरचा हा मार्ग असणार आहे. त्यातील १५२ किलोमीटर भाग ७० मीटर रुंद तर २२२ किलोमीटर भाग ६० मीटर रुंद असेल. दऱ्याखोऱ्यांतून जाणाऱ्या ५.६ किलोमीटरच्या विशेष मार्गासोबत १८.२५ किलोमीटर लांबीचे मोठे पूल उभारले जाणार आहेत. एकूण २७ मोठे आणि १६४ लहान पूल या प्रकल्पात असणार आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे.
महामार्ग पूर्ण झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा दक्षिण भारताशी थेट संपर्क प्रस्थापित होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, कांदा आणि इतर शेतीमाल थेट दक्षिणेकडील बाजारपेठेत कमी वेळेत पोहोचू शकणार आहे. उद्योगधंद्यांनाही मोठा दिलासा मिळेल. विशेषतः सिन्नर एमआयडीसी परिसरातील उद्योगांसाठी हा महामार्ग फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. Maharastra Highway News
सध्या सगळ्यांच्या नजरा उर्वरित जमीन संपादन प्रक्रियेवर लागल्या आहेत. जर ही प्रक्रिया वेळेत आणि सुरळीत पूर्ण झाली, तर पुढील दोन वर्षांत हा स्वप्नवत महामार्ग प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारा हा मार्ग ठरेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
1 thought on “महाराष्ट्रातील या महामार्गाच्या कामाला वेग! असा असणार रूट आणि या भागातील शेतकऱ्यांना मिळणार फायदा..”