Monsoon 2026 | देशभरात वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच आता हवामान विभागाकडून दिलासादायक बातमी समोर आली आहे. उत्तर भारतासह अनेक राज्यांमध्ये तापमानाने चाळिशी पार केली असून, दुपारच्या वेळेत उष्णतेची लाट नागरिकांना अक्षरशः भाजून काढत आहे. अनेक राज्य सरकारांनीही उष्माघाताचा इशारा देत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या आगमनाबाबत मोठी माहिती जाहीर केली आहे. Monsoon 2026
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, यंदाचा नैऋत्य मान्सून 26 मे 2026 रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, मान्सूनच्या आगमनात साधारण चार दिवसांचा फरक पडू शकतो, असेही IMD ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मे अखेरीस देशातील बहुतांश भागात हवामानात मोठा बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
सध्या केरळ, माहे आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने केरळमधील काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. कन्नूर आणि कासरगोड जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
दरम्यान, दक्षिण किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि आसपासच्या भागांमध्ये निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याच प्रणालीमुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सून वेगाने सक्रिय होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. केरळ, दक्षिण कर्नाटक, रायलसीमा आणि लक्षद्वीप परिसरात वातावरणात मोठा बदल जाणवत आहे.
IMD च्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सूनने दक्षिण-पूर्व अरबी समुद्र, कन्याकुमारी परिसर, अंदमान-निकोबार बेटे आणि बंगालच्या उपसागरातील अनेक भागांमध्ये पुढे सरकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत दक्षिण भारतात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सध्या देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढली आहे. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तापमानाने नागरिकांचे हाल केले आहेत. अशा परिस्थितीत मान्सूनचे आगमन ही सर्वसामान्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. विशेषतः शेतकरी वर्गाचे लक्ष आता पावसाकडे लागले असून, खरीप हंगामासाठी तयारी सुरू झाली आहे.
हवामान खात्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करताना वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता असलेल्या भागांमध्ये आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितले आहे. पुढील काही दिवसांत हवामानात मोठा बदल होणार असल्याने अनेक भागांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा : या भागात होणार अतिमुसळधार पाऊस अवकाळी पावसाचा मोठा हाय अलर्ट