Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. फडणवीस सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेत लाडक्या बहिणींसाठी नवीन शासन निर्णय (GR) जारी केला आहे. या निर्णयामुळे केवळ नजरचुकीने ई-केवायसी करताना चूक झालेल्या हजारो महिलांना पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
राज्य शासनाने यापूर्वी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिली होती. यानुसार बहुतांश महिलांनी वेळेत ई-केवायसी केली. मात्र, अनेक महिलांकडून प्रक्रिया करताना चुकीची माहिती भरली गेली. या छोट्याशा चुकांमुळे पात्र असूनही अनेक महिलांचे हफ्ते थांबले आणि त्या योजनेबाहेर फेकल्या गेल्या.
विशेष म्हणजे, ई-केवायसी दरम्यान “कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत आहे” हा पर्याय चुकून निवडल्यामुळे अनेक महिलांचा लाभ बंद झाला होता. प्रत्यक्षात त्यांच्या कुटुंबातील कोणीही सरकारी सेवेत नसतानाही केवळ एका क्लिकमुळे महिलांना दर महिन्याची आर्थिक मदत मिळणे थांबले. यामुळे राज्यभरात महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
ही गंभीर बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर महिला व बालविकास विभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. लाभार्थी महिलांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर सरकारने ई-केवायसी दुरुस्तीसाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. आज शुक्रवार, ६ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
नवीन जीआरनुसार, ज्या महिलांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी ई-केवायसी केली होती, मात्र त्यात चुकीची माहिती नोंदवली गेली होती, अशा महिलांना आता ३१ मार्च २०२६ पर्यंत ई-केवायसी दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. यासाठी लाडकी बहीण योजनेचे ई-केवायसी पोर्टल पुन्हा सुरू करण्यात आले असून, त्यामुळे थांबलेले हफ्ते सुरू होण्याची शक्यता आहे.
शासनाने मात्र स्पष्ट इशारा दिला आहे की, ही शेवटची संधी असेल. ३१ मार्च २०२६ नंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती, बदल किंवा मुदतवाढ दिली जाणार नाही. त्यामुळे पात्र लाभार्थी महिलांनी तातडीने ई-केवायसी तपासून आवश्यक ती सुधारणा करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिला व बालविकास विभागाचे अवर सचिव प्र. वि. कुलकर्णी यांच्या डिजिटल स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे हजारो महिलांना पुन्हा एकदा आर्थिक आधार मिळणार असून, लाडकी बहीण योजना अधिक पारदर्शक आणि न्याय्य करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
आज महागाईच्या काळात दर महिन्याची आर्थिक मदत अनेक कुटुंबांसाठी आधार ठरते. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाने लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचे हास्य फुलले आहे. Ladaki Bahin Yojana