Ladki Bahin Yojana: राज्यभरात लाखो महिलांसाठी आधार ठरलेली लाडकी बहीण योजना सध्या पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. काही महिलांना अचानक लाभ बंद झाल्याने नाराजी वाढली असतानाच, आता तीन महिन्यांचे एकत्र ४५०० रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे ई-केवायसी पूर्ण असूनही ज्यांना पैसे मिळाले नव्हते, त्यांच्यासाठी ही बातमी मोठा दिलासा देणारी आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये थेट जमा केले जातात. विधानसभा निवडणुकीत ही योजना ‘गेमचेंजर’ ठरली होती. मात्र, योजनेचा विस्तार वाढत गेल्याने राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येत असल्याचेही उघडपणे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर काही लाभार्थ्यांचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आले.
दरम्यान, ई-केवायसी न केल्यामुळे अनेक महिलांना लाभ मिळाला नाही. पण धक्कादायक बाब म्हणजे ई-केवायसी पूर्ण करूनही काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी संताप व्यक्त करत शासनाकडे तक्रारी केल्या. गावागावात, वॉर्डनिहाय महिलांनी अंगणवाडी सेविकांकडे आणि पंचायत कार्यालयात धाव घेतली.
या सर्व गोंधळानंतर महिला व बालकल्याण विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या महिलांना ई-केवायसीनंतरही लाभ मिळालेला नाही, त्यांच्या घरपोच पडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत. ही जबाबदारी थेट अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका संबंधित महिलांच्या कागदपत्रांची, वास्तवाची आणि पात्रतेची तपासणी करणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर खऱ्या पात्र लाभार्थ्यांचे हप्ते पुन्हा सुरू होतील, अशी माहिती समोर येत आहे. यामध्ये नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा एकत्रित हप्ता थेट खात्यात जमा केला जाणार असल्याची शक्यता आहे. म्हणजेच पात्र महिलांना थेट ४५०० रुपये मिळू शकतात, अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे. Ladki Bahin Yojana
दरम्यान, लाडकी बहीण योजनेबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनीही महत्त्वाचं विधान केलं आहे. “तिजोरीच्या अडचणी होत्या. अजितदादा गेल्यानंतर अर्थ खाते मुख्यमंत्र्यांकडे गेलं. अधिवेशनानंतर खाते आमच्याकडे येईल. त्यामुळे २१०० रुपये दिल्याशिवाय राहणार नाही,” असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे भविष्यात हप्ता वाढीचीही आशा महिलांमध्ये निर्माण झाली आहे.
एकंदरीत, सध्या ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत, त्यांनी घाबरून न जाता पडताळणी प्रक्रियेत सहकार्य करणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविकांकडून तपासणी पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्त्यांचा मार्ग मोकळा होणार आहे. तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार असल्याने अनेक महिलांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता सर्वांच्या नजरा शासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागल्या आहेत.
1 thought on “लाडक्या बहिणींना 4,500 रुपये एकत्र मिळणार; फक्त याच महिलांना मिळणार लाभ..”