Ladki Bahin Yojana : राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. २०२४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू करताना महिलांना आर्थिक आधार देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या योजनेमुळे २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला १५०० रुपये जमा होऊ लागले. घरखर्च, मुलांचे शिक्षण किंवा छोट्या-मोठ्या गरजांसाठी हा पैसा उपयोगी पडत असल्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील अनेक महिलांना याचा मोठा आधार मिळत आहे.
ही योजना सुरू करतानाच सरकारकडून एक मोठे आश्वासनही देण्यात आले होते. पुन्हा एकदा सरकार सत्तेत आले तर महिलांना मिळणारी मदत १५०० रुपयांवरून २१०० रुपये केली जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र सरकार स्थापन होऊन बराच काळ लोटला असला तरी महिलांच्या खात्यात अजूनही १५०० रुपयांचाच हप्ता येत आहे. त्यामुळे “२१०० रुपये नेमके कधी मिळणार?” हा प्रश्न राज्यभरातील लाडक्या बहिणींना पडलेला आहे.
सध्या महाराष्ट्रा राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात विरोधकांकडूनही हा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध योजनांसाठी मोठ्या आर्थिक तरतुदी जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे याच अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेबाबत एखादी मोठी घोषणा होईल का, याकडे राज्यातील महिलांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. या निधीतून २०२५-२६ या आर्थिक वर्षात महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जात आहेत. पण जर सरकारने २१०० रुपयांचा निर्णय घेतला, तर पुढील आर्थिक वर्षात यासाठी आणखी मोठा निधी द्यावा लागणार आहे. राज्याच्या तिजोरीवर आधीच मोठे कर्ज असल्याची चर्चा सुरू असताना सरकार हा अतिरिक्त आर्थिक भार उचलते का, हा सुद्धा चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान फक्त लाडकी बहीण योजना नाही, तर शेतकऱ्यांची कर्जमाफी हा मुद्दाही सरकारसमोर मोठे आव्हान ठरत आहे. सरकारने ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे याच अर्थसंकल्पात शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. Ladki Bahin Yojana
एकूणच पाहता, येणारा अर्थसंकल्प राज्यातील महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. विशेषतः लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची घोषणा होते का, याकडे लाखो महिलांच्या आशा लागून आहेत. मात्र सध्या तरी सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे उद्याचा अर्थसंकल्पच या प्रश्नाचे खरे उत्तर देणार आहे.